शंभरी पार केलेला पुण्याचा गणेशोत्सव

बरेच वर्ष पुण्यातील गणपती बघायचे हि इच्छा होती, परंतू मुंबईतले गणपती सोडून पुण्याला कश्यासाठी जायचे ह्या विचाराने सोडून देत होतो. पण ह्यावर्षी अनंत चतुर्दशीला नाही तर कमीतकमी आदल्या दिवशी तरी जायचे हे ठरवून ठेवले होते. कोणते गणपती बघायचे आणि कोणत्या क्रमाने हे पण ठरवून ठेवले होता, पण बाप्पाच्या मनात काही तरी वेगळे असावे असे मला वाटले. कारण ज्या क्रमाने मी गणपती बघणार होतो, त्याच्या एकदम उलट्या क्रमाने मी गणपती बघितले, अपवाद फक्त कसबा गणपतीचा.

पुण्यातील गणपतींची भटकंती करण्यापूर्वी थोडेसे भूतकाळात डोकावून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरु करण्यामागची पार्श्वभूमी, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यापूर्वी कोणती मंडळ हा उत्सव साजरा करीत होती, १८९३ साली कोणत्या मंडळांची स्थापना झाली, पुण्यातील सुरुवातीची मंडळ कोणती, विसर्जन मिरवणुकीचा क्रम कसा ठरला, तसेच मानाचे गणपती कोणते इ. याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊ या.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांची ओळख असली तरी हा उत्सव सुरु करण्यामध्ये अग्रभागी होते कै. सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले. त्याचे असे झाले १८९२ साली खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता, तेथे त्यांनी गणपती उत्सव दरबारी थाटात साजरा होताना बघितला आणि असाच सोहळा पुण्यातही व्हावा असे त्यांना वाटू लागले. १८९३ साली पुण्यात तीन सार्वजनिक गणपती स्थापन झाले आणि अश्या तऱ्हेने देवघरात पुजला जाणारा गणपती रस्त्यावर बांधलेल्या मंडपात पुजला जाऊ लागला. त्यापैकी दोन ते तीन गणपती असे होते कि जे सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यापूर्वीच बसत होते, ते म्हणजे गुरुजी तालीमचा गणपती, भाऊ रंगारी यांचा गणपती आणि नागनाथपार मंडळाचा गणपती. २६ सप्टेंबर १८९३च्या केसरीमध्ये टिळकांनी म्हटले, “यंदा येथे गणपती पोहोचवण्याचा समारंभ सालाबादपेक्षा निराळ्या तऱ्हेने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे. गणपती सर्व प्रकारचे हिंदू लोक पुजतात. तेव्हा गणपती पोचवण्याचा समारंभ सार्वजनिक झाल्यास त्यापासून अनासायेच करमणूक होऊन समाजाने एकदिलाने कामे करण्याची हल्लीच्या काळाची जी प्रवृत्ती आहे तीसही थोडीबहुत मदत होईल. आहे त्यापेक्षा असल्या जुन्या संस्थांस थोडेबहुत नवे वळण लावून दिल्यास लोकांस त्या अधिक प्रिय होऊन लौकर चिरस्थायी होण्याचा संभाव आहे. करिता यंदाच्या साली ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत.”

पुण्यातील गणेशोस्तव जेवढा आकर्षक, त्याहून आकर्षक असते गणपती विसर्जन मिरवणूक. लोकमान्य टिळकांनी या उपक्रमाचे केलेले कौतुक आणि त्यांचा असलेला पाठिंबा यांच्यामुळे १८९४ साली तीन सार्वजनिक गणपतींचे १०० गणपती झाले. त्यामुळे रे मार्केट (सध्याची मंडई) येथे मिरवणुकीत कोणाचा गणपती पुढे असावा याच्यावरून वाद सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींनी विसर्जन मिरवणुकीतील गणपतीचा क्रम ठरवून दिला. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला कि मिरवणुकीच्या अग्रभागी ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्री तांबडी जोगेश्वरी यांचे गणपती. या दोन गणपतीनंतर खाजगीवाले यांचा गणपती आणि त्याचप्रमाणे शेवटून तिसरा भाऊ रंगारी यांचा गणपती, शेवटून दुसरा दगडूशेठ हलवाई यांचा गणपती व शेवटी मंडईचा गणपती असा क्रम ठरलेला आहे. १९५० सालानंतर श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मागे गुरुजी तालीम गणपती, गुरुजी तालीमच्या नंतर तुळशीबाग गणपती आणि मग केसरीवाडा गणपती हे तीन गणपती मानाचे म्हणून विसर्जन मिरवणुकीत ओळखले जाऊ लागले.

ठरल्याप्रमाणे शनिवारी २६ सप्टेंबरला सकाळी पुण्यात पोहोचलो आणि सुरु झाली पुण्यातील गणपतींची भटकंती. पहिला गणपती अर्थातच कसबा गणपती असल्यामुळे कसब्यात पोहोचलो. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. कसबा गणपती मंदिराच्या समोरच्या बाजूला गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणपतीची मूर्ती आणि सजावट दोन्हीही एकदम साधे. मानाचा गणपती असूनसुद्धा मुंबईत असते तशी गर्दी कुठेही नव्हती. गणपतीसमोर कितीही वेळ उभे रहा. कोणीही तुम्हाला पुढे चला किंवा जास्त वेळ थांबू नका असे बोलणार नाही. श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला तेव्हा गणपती मंदिरातदेखील हा उत्सव सुरु झाला. ग्रामदैवत असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत हा गणपती अग्रभागी असतो.

कसबा गणपती
कसबा गणपती

कसबा गणपती नंतर मी जाणार होतो त्वष्टा कासार समाजाचा गणपती बघायला, पण बाप्पाने मला पाठवले नागनाथपार सार्वजनिक मंडळाचा गणपती पाहण्यासाठी, आता असे का विचारु नका. ते माझे आणि बाप्पाचे गुपित आहे आणि गुपितच राहाणार. पुण्यात सार्वजनिक गणपती सुरु होण्यापूर्वी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांपैकी एक नागनाथपार गणपती मंडळ. ह्या मंडळाची स्थापना १८९२ झाली आहे. गणपतीबरोबर रिद्धीसिद्धी असणारी पुण्यातील माझ्या माहितीप्रमाणे दुसरी मूर्ती (पहिली मूर्ती शुक्रवार पेठेत असलेल्या श्री लाकडी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती. नावाप्रमाणेच हि मूर्ती लाकडी आहे). नागनाथपार येथील गणपतीची स्थापना, लाकडी देव्हाऱ्यात केलेली असते. अगदी साधेपणाने हे मंडळ उत्सव साजरा करते. ह्या गणपतीच्या चेहऱ्यावर एवढे तेज आहे कि गणपतीकडे बघत बसावे.

नागनाथपार गणपती
नागनाथपार गणपती

नागनाथपार मंडळाच्या गणपतीनंतर पुढचा गणपती होता, दिग्विजय मित्र मंडळाचा. ह्या मंडळाने नरसिंहरथाची सजावट केली होती. परंतु, सकाळी गेलेलो असल्यामुळे मला विद्युत रोषणाई आणि सजावट काही बघता आली नाही. त्यामुळे गणपती दर्शन घेऊन मी निघालो निंबाळकर तालीम मंडळाचा गणपती बघण्यासाठी. निंबाळकर तालीमने मणीमल्ल वधाचा भव्यदिव्य चालता देखावा केला होता. निंबाळकर तालीम येथून नातू बाग येथे जात असताना शनिपार मित्र मंडळ, विश्रामबाग मित्र मंडळ आणि चिमण्या गणपती मित्र मंडळ या गणपतींचे दर्शन झाले, पण सजावट आणि विद्युत रोषणाई बघता आली नाही.

दिग्विजय गणपती मंडळ
दिग्विजय गणपती मंडळ
निंबाळकर तालिम गणपती
निंबाळकर तालिम गणपती

नातूबाग मंडळाचा गणपती बाजीराव रस्त्यावर नातूबाग चौक येथे बसतो. ह्या गणपतीभोवती विद्युत रोषणाईची आरास केली होती, पण सकाळची वेळ असल्यामुळे मला काही ती बघायला मिळाली नाही.

नातूबाग गणपती
नातूबाग गणपती

नातूबाग गणपतीनंतर माझे पुढील लक्ष्य होते अखिल मंडई गणपती मंडळ. मंडईकडे जाताना श्रीकृष्ण व्यायाम मंडळाच्या गणपतीचे दर्शन झाले. गणपतीभोवती कमीतकमी आरास असल्यामुळे ह्या मंडळाच्या गणपतीला भेट देणारे फार कमी. श्रीकृष्ण व्यायाम मंडळाच्या गणपतीच्या थोडेशे पुढे आहे अखिल मंडई गणपती मंडळ. सुरुवातीच्या काळात रे मार्केट, त्यानंतर छत्रपती शिवाजी संघ आणि आता अखिल मंडई मंडळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची स्थापना १८९४ साली झाली. ह्या मंडळाचा गणपती शारदा गणेश नावाने ओळखला जातो. गणपती लोडाला टेकून बसला असून शारदा त्याचे पाय चेपत आहे, अशी शारदा गणेशाची मूर्ती आहे. ह्यावर्षी मंडळाने विष्णूमहालाचा देखावा तयार केला होता. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती एकदम शेवटी म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर शेवटून पहिला असा मान या गणपतीला आहे.

श्रीकृष्ण मंडळ
श्रीकृष्ण मंडळ
अखिल मंडई गणपती मंडळाचा शारदा गणेश
अखिल मंडई गणपती मंडळाचा शारदा गणेश

मंडई गणपतीनंतर माझी पावले वळली बाबू गेनू मंडळाच्या मंडपाकडे. नवसाचा गणपती अशी ह्या गणपतीची ओळख आहे. गणपतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मागे असलेल गणेश चक्र आणि गणपतीच्या डोक्यावर मुकुटाऐवजी असलेली पगडी.

बाबू गेनू मंडळ
बाबू गेनू मंडळ

बाबू गेनू मंडळाच्या पुढे आहे पुण्यातला सर्वात प्रसिद्ध असा दगडूशेठ हलवाई गणपतीमंडळाचा गणपती. पुण्यातील प्रतिष्ठित असे हे मंडळ. दरवर्षी भव्यदिव्य अशी सजावट आणि विसर्जन मिरवणुकीत विद्युतरोषणाईयुक्त विसर्जनरथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य. कोणत्याही मंदिरातील देवतेची मूर्ती हलवली जात नाही,पण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात असलेली गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात नसून जिथे उत्सव साजरा केला जातो त्या मंडपात असते. ह्या सार्वजनिक गणपतीची स्थापना दगडूशेठ यांनी १८९३ साली लोकमान्य टिळकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर केली. सुरुवातीला बाहुलीच्या हौदाचा गणपती,नंतर सुवर्णयुग गणपती आणि आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या नावाने हा गणपती ओळखला जातो. पुण्यातील गणपती बघताना ह्याच ठिकाणी गर्दीला तोंड द्यावे लागले. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती शेवटून दुसरा असतो. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन ३ वर्ष पूर्ण होत नाहीत, तोच १८९६ साली पुण्यात प्लेगची साथ आली. ह्या साथीत दगडूशेठ यांचा मुलगा दगावला. हा धक्का सहन न झाल्याने दगडूशेठसुद्धा ३-४ महिन्यात निर्वतले. असे म्हणतात कि दगडूशेठ यांचे निर्वाण होऊन काही काळ गेल्यानंतर एका दैवी पुरुषाने दगडूशेठ यांच्या पत्नीला दगडूशेठ यांच्या नावाने दत्तमंदिर बांधण्यास आणि मुलगा दत्तक घेण्यास सांगितले. दैवी पुरुषाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी दत्ताबरोबर गणपतीची मुर्तीही पेठेतल्या लोकांना दिले. तोच हा दगडूशेठ हलवाई गणपती.

दगडूशेठ हलवाई गणपती
दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ गणपतीनंतर तुळशीबागेसमोर असलेल्या जिलब्या गणपती मंडळाकडे माझे लक्ष गेले. पुण्यातल्या गणपती मंडळांची नावे एकदम विलक्षण आहेत, उदा. जिलब्या मारुती, चिमण्या गणपती, हत्ती गणपती, मोती गणपती, इ. आणि अशी अजून बरीच मंडळ असतील.

जिलब्या मारुती मंडळ
जिलब्या मारुती मंडळ

जिलब्या गणपतीच्या समोरच्या छोट्याश्या गल्लीतून गेलो कि आपल्याला तुळशीबाग मंडळाचा गणपती बघायला मिळतो. इतर मानाच्या मंडळांपेक्षा थोडीशी उशिरा म्हणजे १९०१ साली ह्या मंडळाची स्थापना झाली. मंडळाने १९७५ साली गणपतीची कायमस्वरूपी फायबर ग्लासची मूर्ती तयार केली. विसर्जन मिरवणुकीत हा चौथा मानाचा गणपती आहे.

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तुळशीबाग येथून गुरुजी तालीम येथे जात असताना स्वानंद मित्र गणपती मंडळ लागले. ह्या मंडळाने काल्पनिक देखावा केला होता. गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रोडवर बसतो. गुरुजी तालीम हि त्याकाळात पुण्यामध्ये असलेल्या सर्व तालीमांपेक्षा मोठी तालीम. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम वल्लद लालाभाई व रुस्तमभाई या गुरूंनी या तालमीची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, त्यांच्याही आधी म्हणजे १८८७ साली गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळात तालमीचे गुरुवर्यच गणपतीचे व्यवस्थापक होते. सुरुवातीला हा गणपती तालमीत बसत होता, पण लक्ष्मी रोड मोठा झाल्यानंतर तालमीत असलेल्या मंदिरात मांडव टाकून उत्सव साजरा केला जाऊ लागला. मानाचा तिसरा गणपती अशी ह्या गणपतीची ओळख आहे. गणपतीची मूर्ती उंदरावर स्वार असून देखणी आहे. मूळ मूर्ती व उत्सव मूर्ती अश्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत. मूळ मूर्ती तालमीच्या जागेवर बांधलेल्या मंदिरात असते.

स्वानंद मंडळ
स्वानंद मंडळ
गुरुजी तालिम गणपती
गुरुजी तालिम गणपती

गुरुजी तालीम गणपतीनंतर श्री तांबडी जोगेश्वरी येथे जाताना जय बजरंग मंडळाच्या गणपतीचे दर्शन झाले. ह्या मंडळाने सुद्धा काल्पनिक देखावा केला होता. शिवशक्ती मंडळापासून हाकेच्या अंतरावर आहे पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती. मानाचा दुसरा गणपती असलेल्या ह्या गणपतीची स्थापना १८९३ साली झाली.या मंडळाची मूर्ती करण्याचे काम गुळणकर घराण्याकडे वंशपरंपरेने चालू आहे. श्रींची मूर्ती चांदीच्या देव्हाऱ्यात स्थानापन्न असते. ग्रामदेवता जोगेश्वरीच्या सन्मानार्थ ह्या मंडळाला दुसऱ्या क्रमांकाचा मान खुद्द लोकमान्य टिळकांनी दिला आहे. ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघते, तसेच श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते.

जय बजरंग मंडळ
जय बजरंग मंडळ
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेऊन निघालो केसरीवाड्याकडे. केसरीवाडा गणपती हा अप्पा बळवंत चौकापासून आणि इतर गणपतींच्या मानाने थोडा लांब आहे. केसरीवाड्यापर्यंत पोहोचेपर्यंत इथे गणपती बसतो हे बाहेरच्या माणसाला सांगूनसुद्धा खरे वाटणार नाही एवढी शांतता. इथे कोणत्याही प्रकारचे कर्णकर्कश्श संगीत चालू नव्हते (तसे पुण्यात गणपती बघताना कुठेही कर्णकर्कश्श आवाजात गाणी ऐकायला नाही मिळाली, अपवाद सोडल्यास) किंवा भाविकांची गर्दी नव्हती. पारंपारिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे हे काटेकोरपणे पाळणारे मंडळ अशी ओळख असलेल्या ह्या गणेशोत्सवाची सुरुवात १८९४ साली झाली. गणपतीच्या मागे टिळकांची भव्य मूर्ती होती. उत्सवमूर्तीबरोबर गणपतीच्या कायमस्वरूपी मूर्तीची पण पूजा केली जाते.

केसरीवाडा गणपती
केसरीवाडा गणपती

केसरीवाड्याच्या बाजूलाच असलेल्या भोलेनाथ मित्र मंडळ यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती केली होती. ह्या मंडळाची मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. भोलेनाथ मित्र मंडळानंतर पुढचे मंडळ होते कडबा आळी तालीम. हे मंडळ शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला आहे. ह्या मंदिराने काल्पनिक देखावा केला होता, ह्या मंडळाची कायमस्वरूपी चंदनाची गणेशमूर्ती अप्रतिम आहे. कडबा आळीतून भाऊ रंगारी गणपती येथे जाताना वाटेवरच श्री गणेश आझाद मित्र मंडळ असून, ह्या मंडळात गणपतीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुध्दा होती. आझाद मित्र मंडळाच्या पुढेच आहे प्रसिद्ध भाऊ रंगारी यांचा गणपती.

भोलेनाथ मित्र मंडळ
भोलेनाथ मित्र मंडळ
कडबा आळी
कडबा आळी
गणेश आझाद मंडळ
गणेश आझाद मंडळ

लोकमान्य टिळकांनी गणेशोस्तव सुरु करण्यापूर्वी भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. १८९२ साली भाऊसाहेबांनी घराघरात पुजला जाणारा गणपती सार्वजनिकरीत्या स्थापन केला. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शेवटून तिसरे मानाचे स्थान या गणपतीला दिले. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. शनिवारवाड्याच्यामागे असलेले त्यांचे निवासस्थान व दवाखाना आपल्याला अजूनही बघावयास मिळते. १२४ वर्षांपूर्वी भाउसाहेबांनी स्वतः कागदाच्या लगद्यापासून केलेली मूर्ती आणि तेवढाच जुना असलेला मिरवणुकीचा रथ हे या गणपतीचे वैशिष्ट्य. गणपती राक्षसाच्या छातीवर बसला असून त्याने सोंडेने त्याच्या हाताला विळखा घातला आहे. गणपतीचा उजवा हात उगारलेल्या स्थितीत आहे आणि हातात शस्त्र म्हणून रक्तरंजित दात धारण केलेला आहे.

भाऊ रंगारी गणपती
भाऊ रंगारी गणपती

भाऊ रंगारी गणपतीनंतर मोर्चा वळला साईनाथ मित्र मंडळाकडे. या मंडळाने “लहान मुलांचे शाळेचे दप्तर कमी करा” या सामाजिक विषयावर सुंदर देखावा केला होता. ह्या गणपतीनंतर निघालो त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पहिल्या वर्षी म्हणजे १८९३ साली या मंडळाची स्थापना झाली. अंदाजे १२२ वर्षापूर्वी शमीच्या लाकडापासून तयार केलेली शोभिवंत आणि तेजस्वी मूर्ती हे या मंडळाच्या श्रींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य.

साईनाथ मित्र मंडळ
साईनाथ मित्र मंडळ
त्वष्टा कासार गणपती
त्वष्टा कासार गणपती

पुण्यातील गणपती बघत असताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणत्याही मंडपासमोर गर्दी आणि पडदा नव्हता. त्यामुळे गणपती आणि रोषणाई लांबूनसुद्धा दिसत होती. तसेच येथील गणपती विविध रुपात आणि रंगात नव्हते. सर्व गणपती बसलेले, एखाद दुसरा राक्षसाचा संहार करताना किंवा हत्तीवर बसलेला.

पुण्यातला गणेशोत्सव जेवढा भव्यदिव्य, तेवढीच नयनरम्य असते विसर्जन मिरवणूक. एकदा तरी पुण्यातील विसर्जन सोहळा अनुभवायचा. बघू कधी योग येतो ते………..!

संदर्भ

गणेशोत्सव सुरु होण्यामागील पार्श्वभूमी व केसरीतील गणेशोत्सवावरील लोकमान्य टिळकांचा लेख, मंदार लवाटेलिखितपुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षांचा (१८९३ ते २०१३) या पुस्तकातून घेतला आहे.

Creative Commons License

© Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s